ऊसदराची कोंडी तुटल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या आहेत. सोमवारी नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ पार पडला. उर्वरित कारखाने उद्या, परवा सुरू होणार असल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले आहे. यापैकी कोणता कारखाना २ हजार ५०० पेक्षा अधिक दर जाहीर करतो, याकडे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने १५ नोव्हेंबरपासूनच साखर कारखाने सुरू व्हावेत, यादृष्टीने नियोजन केले होते. ऊसदर निश्चित न झाल्याने शेतकऱ्यांकडून ऊस देण्यास विरोध झाला होता. तर ऊसदरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलन तापवत ठेवले होते. याची दखल घेत साखर कारखानदारांच्या तीन बैठका झाल्या. काल अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पहिली उचल २ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय झाला. पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही ही उचल मान्य केली. पण शेतकऱ्यांनी आणखी थोडा वेळ थांबावे, त्यांना याहून चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अडीच हजार दर देणाऱ्या कारखान्यांची ऊसतोडणी व वाहतूक थांबवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.                

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा