कर्जत : राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री असतानाही शरद पवार हे कधीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी आलेले नाहीत, मग त्यांना वयाच्या ८२ व्या वर्षी आताच चौंडी का दिसली, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चौंडी येथील जाहीर सभेमध्ये बोलताना विचारला.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाफगाव ते चौंडीपर्यंत अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जनजागृती यात्रा काढली होती. यात्रेचा समारोप आज, मंगळवारी चौंडी येथे झाला. या वेळी माजी मंत्री राम शिंदे, सदाभाऊ खोत, धनगर समाजाचे बारामतीचे नेते  राऊत, ज्येष्ठ नेते शांतिलाल कोपनर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भगवान मुरूमकर, विनोद दळवी, अनिल गदादे , शरद मेहेत्रे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी पडळकर म्हणाले, की पवार कुटुंबीयांनी अहिल्यादेवींच्या जयंतीत राजकारण आणले, हे योग्य झाले नाही. देशभरातून येणारे धनगर बांधव दर वर्षी ही जयंती साजरी करतात. तो त्यांचा हक्क आहे. असे असताना केवळ राजकारणासाठी हा जयंती उत्सव बंद पाडण्यासाठी शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांनी पुढाकार घेतला. या जयंती उत्सवासाठी पवार यांनी वापरलेला पैसा हा भ्रष्टाचाराचा व मुंबई येथील दाऊद इब्राहिमशी संबंधित मंत्र्यांच्या पैसा आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. या वेळी सदाभाऊ खोत यांनीही शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली.

पडळकर यांचे जल्लोषात स्वागत

आमदार पडळकर यांचे चौंडी येथे आगमन होत समर्थकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले. जयंती उत्सव सोहळय़ानंतर हजारो युवक पडळकर यांच्या स्वागतासाठी थांबले होते. यानंतर अक्षरश: रणरणत्या उन्हात आणि डांबरी रस्त्यावर प्रचंड उष्णता असतानाही भर उन्हात पडळकर यांची जाहीर सभा झाली. या वेळी उपस्थित मोठय़ा प्रमाणात घोषणाबाजी करत होते.

पुढील वर्षी देशभरातील धनगरबांधव जयंती साजरी करणार!

पुढील वर्षी चोंडी येथील अहिल्यादेवींची जयंती देशातील व राज्यातील सर्व धनगर समाजबांधव एकत्र येऊन साजरी करणार. इतर कोणालाही या ठिकाणी जयंती आम्ही साजरी करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, की चौंडीत जयंती उत्सव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे. वास्तविक  या ठिकाणी येऊन त्यांनी केवळ राजकारणासाठी जयंती साजरी केली. मात्र आमदार पडळकर व येथे उपस्थित सर्व समाजबांधवांनी त्यांना जयंती काय असते, हे दाखवून दिले.  मात्र पुढील वर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये चौंडीतील अहिल्यादेवींचा जयंती सोहळा समाज बांधव साजरा करतील, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader