Sharad Pawar on Atul Benke : जुन्नरचे आमदार आणि सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेल्या अतुल बेनके यांनी आज सकाळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काही काळ त्यांच्याशी संवादही साधला. अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार गटात परतत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली. शरद पवार यांना जेव्हा याबाबत विचारले तेव्हा त्यांनी अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते, अशी आठवण सांगितली. तसेच लोकसभा निवडणुकीत आमचे काम ज्यांनी केले, त्यांना विसरणार नाही, असेही शरद पवार म्हणाले. त्यानंतर काही तासांतच दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत कोण अतुल बेनके? असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी विचारला.
दरम्यान नारायणगाव येथे जेव्हा शरद पवार आणि अतुल बेनके यांची भेट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी त्यांना अतुल बेनके यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार म्हणाले, “यात नवीन काय? लोक भेटायला येत असतात. अतुलचे वडील माझे मित्र आहे. माझ्या मित्राचा तो मुलगा आहे. राजकारणाचा निर्णय त्या त्या वेळेस घेऊ.”
हे वाचा >> शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच, पण..; सुनील शेळके नेमकं असं का म्हणाले?
कोण अतुल बेनके? असं पवार का म्हणाले?
मात्र या भूमिकेनंतर पुण्यात पुन्हा पत्रकार परिषदेला बोलत असताना त्यांनी कोण अतुल बेनके? असा प्रश्न विचारला. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना अतुल बेनके यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला होता. अतुल बेनके म्हणाले, “विधानसभा निवडणुकीपर्यंत काहीही होऊ शकते. दोन्ही गट कदाचित एकत्रही येऊ शकतात.” अतुल बेनके यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार संतापले. ते म्हणाले, “कोण अतुल बेनके? हे कोण आहेत? पक्षाच्या अध्यक्षाने उत्तर द्यावे, एवढा महत्त्वाचा माणूस आहे का? पत्रकारांनी कुणाबद्दल प्रश्न विचारावा, याचे काही तारतम्य ठेवावे. राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधाने करतात. त्यांची नोंद घ्यायची नसते.
ऐका, शरद पवार नेमके काय म्हणाले?
अतुल बेनके काय म्हणाले?
शरद पवार यांना भेटल्यानंतर अतुल बेनके म्हणाले की, “पवार साहेब, अजित पवार, सुप्रिया ताई, दिलीप वळसे पाटील अशा सर्वांचा माझ्यावर आशीर्वाद राहिला आहे. या सगळ्या नेत्यांना पाहतच मी मोठा झालो आहे आणि एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी जुन्नर तालुक्यातून निवडून आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही स्थित्यंतरे झाली; तेव्हा मी सहा महिने तटस्थ भूमिकेत होतो. शरद पवार साहेबांबरोबर जायचे की अजित पवार यांच्याबरोबर जायचे, याबाबतचा गोंधळ माझ्या मनात होता. जुन्नर तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी असल्याने लोक अनेक विकास कामांसाठी माझ्याकडे अपेक्षेने येतात. ही विकासकामे पूर्णत्वास जावीत, यासाठी मी अजित पवार यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यातून जुन्नर तालुक्याला न्याय देऊ शकलो, याबाबत माझ्या मनात समाधान आहे.”
शरद पवार गटात प्रवेश करणार का?
अतुल बेनके शरद पवारांचे दार ठोठावत आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले की, “दार ठोठावायचा विषय नाही. मी त्या दृष्टीकोनातून अद्याप विचार केलेला नाही. किंवा अतुल तू इकडे ये, असेही पवार साहेब मला कधी म्हणालेले नाहीत. राजकारण राजकारणाच्या पातळीवर चालत राहिल. आमदार झाल्यापासून मी अनेक स्थित्यंतरे पाहिलेली आहेत आणि येणाऱ्या काळात काय घडेल, याची मला कल्पना नाही. मात्र, त्यामध्ये न पडता जुन्नरच्या हितासाठी जे काम करता येईल, ते मी करत राहीन.”
शरद पवार – अजित पवार एकत्र येऊ शकतात – बेनके
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचे उमेदवार असाल की तुतारीचे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना काहीही होऊ शकतं. त्यावर आता लगेच भाष्य करण्यात काहीही अर्थ नाही. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही घडू शकतं. कदाचित अजित पवार आणि शरद पवार साहेबही एकत्र येऊ शकतात. २८८ मतदारसंघांमधील मी एक छोटा घटक असल्याने पुढे काय होणारे, याबाबत मी कसे काय सांगू शकेन?”