महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमात दिसत आहेत. तसंच, लोकसभा निवडणूक मनसे लढवणार असल्याचं जाहीर झाल्यापासून शर्मिला ठाकरे अनेकाविध राजकीय भाषणेही करत आहेत. या भाषणांतून त्या सातत्याने सत्ताधारी युती आणि महाविकास आघाडीवर तोफ डागत आहेत. काल (५ फेब्रुवारी) पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी कोविड काळात सत्ताधारी पक्ष बंगल्यात बसून होते, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पुण्यातील कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मार्च- एप्रिल महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील. मग ऑक्टोबरमध्ये आमदारकीच्या निवडणुका. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका लागतील. पण तरीही आमची कामं थांबत नाहीत. आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरू असतात.”

“कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी काम केलं तेवढी कामं कोणत्याही पक्षाने केली नव्हती. तेव्हा सगळे सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते. आपला पक्ष रस्त्यावर होता. आपली चांगली चांगली पोरं कोविडमध्ये दगावली. तरीही मी अभिमानाने सांगेन की आमचा पक्ष एवढी चांगली कामं करतोय तर तुमचा कृपाशिर्वाद असाच राहुदे”, असंही आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

“आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार होते, आपण एवढी कामं केली, पण लोकांनी (मतदानावेळी) चूक केली. पण यावेळी लोक चूक करणार नाहीत. तुमच्या फोनवर उपलब्ध असलेले चांगले उमेदवार आहेत. हे उमेदवार तुमची कामं पटापट करतात. त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवा. त्यांना नक्कीच मला वरच्या स्तरावर बघायचं आहे”, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmila thackeray attacks uddhav thackeray again says in the bungalow during covid 19 sgk