अनेक वर्षांनी काँग्रेसची पक्षांतर्गत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती असणार आहेत. या निवडणुकीत खासदार मल्लिकार्जून खरगे आणि खासदार शशी थरूर आमनेसामने आहेत. अशातच खरगे पक्षश्रेष्ठींच्या जवळचे उमदेवार असल्याची आणि काँग्रेस पक्षाचा त्यांनाच पाठिंबा असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत शशी थरूर यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्ध्यातील सेवाग्राम येथे बापूकुटीत महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी चिंतामणी कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
खरगेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा असल्याच्या चर्चेवर शशी थरूर म्हणाले, “मी याविषयी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी बोललो. त्यांनी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोणीच नाही आणि आम्ही निष्पक्ष राहू असे सांगितले.”
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे, असं विचारलं असता शशी थरूर म्हणाले की, मला कोणाचा पाठिंबा आहे हे मतमोजणीनंतर दिसून येईल. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक पक्षासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं.
शशी थरूर म्हणाले, “स्वातंत्र्याची चळवळ ज्या पवित्र ठिकाणावरून झाली त्या सेवाग्राम येथून मी माझ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करतो आहे. माझ्या उमेदवारीने देशाला सक्षम विरोधी पक्ष मिळेल. मी काँग्रेसच्या वर्तमान परिस्थितीवर वाईट बोलणार नाही. मी पक्षात बदल आणू इच्छितो. आमचा पक्ष मी मी करणारा नाही, तर आम्ही म्हणणारा आहे.”
“एकीकडे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दुसरीकडे राहुल गांधी यांची पदयात्रा दोन्हीची देशात चर्चा आहे. यामुळे पक्ष जागृत होत असून देशात चांगला संदेश जात आहे. आपल्या देशाला सक्षम बनवण्यासाठी काँग्रेस पार्टी प्रयत्न करत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी काँग्रेसचे युवा नेते आशिष देशमुख, माजी प्रदेश सचिव प्रवीण हिवरे, माजी शहर अध्यक्ष राजेंद्र शर्मा, इक्रम हुसेन आदींची उपस्थिती होती.
“महाराष्ट्राच्या अन्य भागातही जाणार”
काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर होते. शनिवारी नागपुरात आल्यावर त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. आज थरूर यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. थरूर पदाधिकारीच्या भेटीगाठी घेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचं आवाहन करत आहेत. ते महाराष्ट्रात आणखी इतर ठिकाणी जाऊनही पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.