आपापल्या जिल्ह्य़ात जातीय सलोखा राखण्याची प्रत्येक पालकमंत्र्यांची प्रथम जबाबदारी आहे. नगरचे पालकमंत्री मधुकर पिचड यांचा, त्यांना लाल दिव्याची गाडी केवळ फिरण्यासाठी मिळाली असल्याचा समज झालेल दिसतो. असे असेल तर पिचड यांनी पालकमंत्रिपद सोडावे, असे उपहासात्मक आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी केले.
महासंघाच्या पदाधिका-यांसह पवार यांनी शनिवारी खर्डा (ता. जामखेड) येथे भेट दिली. तत्पूर्वी नगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. महासंघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष संतोष ननावटे, राज्य समन्वयक संभाजी दहातोंडे, सचिव रमेश बोरुडे, उपाध्यक्ष शिवाजी डौले आदी या वेळी उपस्थित होते.
खडर्य़ाच्या घटनेच्या निमित्ताने मराठा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाज राजकारणबाह्य़ नाही, की कोणीही उठावे आणि समाजाला टार्गेट करावे. त्यामुळे जातीय सलोख्यात ‘काडय़ा’ करणा-यांचा वचपा निवडणुकीत काढू व त्याला महासंघाच्या स्टाइलने उत्तरही दिले जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला. खडर्य़ाची घटना ही जातीयवादातून नव्हेतर दोन कुटुंबांतील वादातून झाली आहे. परंतु काही नेते घटनेला जातीयवादाचे स्वरूप देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
घटनेतील पीडित मुलीलाही मदत मिळावी व तिचे पुनर्वसन केले जावे, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे सांगताना पवार म्हणाले, पालकमंत्र्यांसह शासनकर्ते केवळ आगे कुटुंबाची भेट घेऊन मदत देत आहे, हे एकतर्फी आहे. काही वृत्तवाहिन्या या घटनेचे निमित्त करीत आग लावण्याचे उद्योग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी महासंघ मदत करणार असल्याचे सांगताना दहातोंडे यांनी राज्य महिला आयोगाने मुलीला मदत न केल्याने आयोगाच्या कार्यालयाला दि. १४ रोजी टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
… तर पालकमंत्रिपद सोडलेलेच बरे!
आपापल्या जिल्ह्य़ात जातीय सलोखा राखण्याची प्रत्येक पालकमंत्र्यांची प्रथम जबाबदारी आहे. नगरचे पालकमंत्री मधुकर पिचड यांचा, त्यांना लाल दिव्याची गाडी केवळ फिरण्यासाठी मिळाली असल्याचा समज झालेल दिसतो.
First published on: 11-05-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashikant pawar criticized madhukar pichad