वाई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या घोटाळ्याचा उल्लेख विरोधक करतात, त्याचा आणि माझ्यासह बाजार समितीतील संचालकांचा काडीमात्र संबंध नाही. ऐन लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघांमध्ये खासदार शरद पवार यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने जनता उभी राहिली, हे पाहून विरोधकांनी षडयंत्र रचून माझ्यावर बेछूट आरोप केले आहेत, असे सांगत मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी फेटाळले आहेत.
सातारा येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर यांची यावेळी उपस्थित होते. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीचे अनुषंगाने आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद आपली बाजू मांडली.
आणखी वाचा-रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
शशिकांत शिंदे म्हणाले, बाजार समितीतील आमचे संचालक मंडळ २००८ मध्ये अस्तित्वात आले आहे. तर व्यापाऱ्यांना गाळेवाटप हे १९९० मध्ये झालेले आहे. व्यापाऱ्यांना बाजार समितीतील त्यांचा वाढीव एफएसआय हवा होता, बाजार समितीचे संचालक मंडळाने त्याच्यावर ठराव करून तो पणन मंत्रालयाला पाठवला होता. भाजपचे नेते तत्कालीन पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याला मान्यता दिली होती. या प्रस्तावाला पर्यावरण दिल्ली यांची मान्यता घेतली होती. त्यानंतर सिडको महानगरपालिकेला योग्य तो कर भरला होता आणि बाजार समितीने व्यापाऱ्यांकडून चेक ने पैसे घेऊन ते खात्यावर भरलेले आहेत.
लोकशाहीमध्ये निवडणूक आल्या की आरोप प्रत्यारोप होतात. मात्र, सध्या यंत्रणेचा वापर करून राजकीय विश्वासहर्ता संपविण्याचा घाणेरडा प्रयत्न आरोप करणाऱ्यांकडून होत आहे. ज्या चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत आरोप करणारे बोलत आहेत, त्याबाबत दोषी कोण आहेत, हेच ठरलेले नाही. सरकारी यंत्रणेचा वापर करून बाजार समितीतील घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे आरोप होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून या प्रकरणी जामीन मागितला. न्यायालयाने या सर्व प्रकरणात तुमचे नावच कुठे नाही तर तुम्हाला जमीन कशासाठी द्यायचा असा प्रश्न विचारला. जेव्हा तुमचे नाव येईल तेव्हा बघू असे न्यायालय म्हणाले. संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मग विरोधक चुकीचे आरोप कशासाठी करत आहेत. मुंबई बाजार समितीचे वार्षिक अंदाजपत्रक ही एवढ्या रकमेचे नाही तेवढ्या चार हजार कोटींचा घोटाळा सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन असे ही शिंदे म्हणाले. माझ्या पाठीशी सर्व माथाडी बांधव आहेत असे ते म्हणाले.
आणखी वाचा-अमित देशमुख यांचा आरोप, “भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरोधातच, कारण…”
त्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई तर होणारच- उदयनराजे
त्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. शरद पवार साताऱ्यात आल्यानंतर नेहमी यशवंत विचार मांडत असतात. परंतु या विषयावर त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं. त्यांनी या विषयावर मौन का बाळगल आहे असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे
शशिकांत शिंदे म्हणतात ते रडीचा डाव खेळत आहेत. पण ते जनतेच्या पैशाचा वापर करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी असा सर्व यंत्रणांचा अहवाल असताना त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही तर ते जामीन घेण्यासाठी का गेले होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्यावर कारवाई ही होणारच असेही उदयनराजे म्हणाले.
आणखी वाचा-सांगलीच्या रक्तातच बंड, आता माघार नाही – विशाल पाटील
मी शशिकांत शिंदे यांना प्रतिस्पर्धी किंवा विरोधक समजत नाही. माझा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणे सर्व धर्मसमभावाचा विचार आहे. मी कोणतीही चुकीची गोष्ट मला आवडत नाही आणि मी ती सहन करत नाही हे सर्वांना माहिती आहे. कोणीही जनतेच्या विरोधातल्या काही गोष्टी केल्या असतील तर त्याला मी ही विरोध करणारच. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आमदार महेश शिंदे आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी हा विषय प्रामाणिकपणे उपस्थित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संबंधात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत असेही उदयनराजे म्हणाले.