काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर राज्यभरात लागले होते. या बॅनरबाजीवरून चर्चांना उधाण आलं होतं. यातच आता आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. कोणाला वाटत नाही, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“आम्हाला आमच्या पक्षाचे नेते म्हणून अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं. अजित पवारांमध्ये ती पात्रता, क्षमता आणि योग्यता आहे. शरद पवारांप्रमाणे अजित पवार सकाळी ७ पासून कामाला लागतात. महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि अभ्यास असलेला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या लोकांची आहे. पण, शरद पवार आणि महाविकास आघाडी याबाबत निर्णय घेईन,” असं शशिकांत शिंदेंनी सांगितलं.
हेही वाचा : “संजय राऊत कोणाकोणाच्या घरात बॅगा तपासायला गेलेले?”, सामनातील अग्रलेखावरून छगन भुजबळांचा टोला
“महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला, तर येणारा मुख्यमंत्री तिन्ही पक्षातून एक असेल. त्यात अजित पवारांना संधी मिळाली, तर महाविकास आघाडी आणखी मजबूत होईल,” असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं.
“शरद पवार आणि अजित पवारांचं सातारा जिल्ह्यासाठी फार मोठं योगदान आहे. रयत शिक्षण संस्था, मेडिकल कॉलेज आणि अन्य वेगवेगळ्या विकासाला अजित पवारांचा सहयोग होता,” असेही शशिकांत शिंदे म्हणाले.
हेही वाचा : “राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष”, फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
शशिकांत शिंदे यांनी शिवसेना ( शिंदे गट ) आमदार महेश शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “शिंदे गटातील आमदारांचा बाजार समितीच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी पराभव झाला आहे. या पराभवाचं विश्लेषण म्हणजे जनतेत त्यांच्याबद्दलची नाराजी आहे. कोरेगाव यालाही अपवाद नाही. येथील आमदार स्वत: मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात,” असं टीकास्र शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंवर सोडलं आहे.