राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपावर गंभीर आरोप केलाय. भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात यावं म्हणून मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय. तसेच त्यांना माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असंही मत व्यक्त केलं. ते साताऱ्यातील कट्टापूरमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, “भाजपाचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, ते आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. मला वाटतं तेव्हा १०० कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही.”
हेही वाचा : पिण्याशिवाय इतर कारणासाठी पाणी चोरून वापरल्यास गुन्हे दाखल करणार- शशिकांत शिंदे
“भाजपाला, ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावणारे कुणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी किरीट सोमय्या येथे आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांचा एकदा तोतरेपणा बाहेर काढतो की नाही बघा, पण अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं,” अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
“ईडी, इनकम टॅक्सच्या बापालाही घाबरत नाही”
“आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाला घाबरत नाही आणि आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही,” असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं.