रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या संशयास्पद आहे. या हत्येमागे कोणा-कोणाचे हितसंबंध आहेत, हे उघड झालं पाहिजे. वारीशे हत्या प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. तरी, या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे? हे जनतेसमोर आलं पाहिजे. यासाठी शशिकांत वारीशे हत्याप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीश आणि निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, “रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरीचा प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध आहे. याबाबत पत्रकार शशिकांत वारीसे बातम्या देत होते. यातूनच ही हत्या झाल्याचं दिसत असले तरी, हत्येमागे कोणाचं हितसंबंध दडलेले आहेत? या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता का? रिफायनरी समर्थकांकडून ही हत्या झाली आहे का? यात राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत का? अशा अनेक मुद्द्यांचा तपास झाला पाहिजे.”

हेही वाचा : “नारायण राणे आंतरराष्ट्रीय नेते, फ्रान्स, अमेरिका, लंडन येथील…”, संजय राऊतांनी उडवली खिल्ली!

“राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीच्या सभेत रिफायनरी होणारच कोण अडवतेय ते पाहू असे जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासात ही हत्या झाली; हे संशयास्पद वाटत आहे. या सभेमुळे हत्या करण्यास प्रेरणा मिळाली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे वारीशे यांच्या हत्येचा सखोल तपास होऊन गुन्हेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे,” अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असेही लोंढेंनी म्हटलं.

Story img Loader