गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योजक गौतम अदाणी यांचं एकप्रकारे समर्थन केलं होतं. तर अजित पवार यांनीही ईव्हीएमचं समर्थन करत विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या असून शिंदे गटाने या भेटीवरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा – आघाडीत समन्वय राखण्यावर भर; वंचितबाबत सहमती नाही, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
शितल म्हात्रेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसेच आडनावाचा वारसा आला, पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला. कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला. पक्ष गेला, चिन्हही गेलं आणि आता स्वाभिमानही गेला, अशी टीकाही त्यांनी केली.
उदय सामंतांचाही उद्धव ठाकरेंना टोला
दरम्यान, या भेटीवरून शिंदे गटाचे आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही ठाकरे गटाला लक्ष्य केलं. संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते. त्यानंतर अदाणींच्याबाबतीत शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य आणि अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेलं वक्तव्य सर्वांनीच बघितलं आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही म्हणून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असावी, असा टोला त्यांनी लगावला.