ठाकरे गटातील नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचे खुले आव्हान दिलेले आहे. हिंमत असेल तर माझ्याविरोधात लढा असे आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. त्यांच्या या आव्हानानंतर एकनाथ शिंदे यांनी वरळीमध्ये जाहीर सभा घेतली. त्यानंतर या सभेमधील खुर्च्या रिकाम्याच होत्या, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. दरम्यान यावरच शिंदे गटातील नेत्या मंदा म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन आमदारांचा बळी देऊन तुम्ही वरळीत आमदारकी मिळवली. जिथे वास्तव्य आहे तिथे म्हणजे वांद्रे येथून निवडणूक का लढवली नाही, असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर आज माध्यम प्रतिनिधींशीं बोलत होत्या.
हेही वाचा >> राज्यात पुन्हा राजकीय वादळ उठणार? बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”
दोन आमदारांना बळी देऊन तुम्ही वरळीत आमदारकी मिळवली
“तुम्ही म्हणता वरळी हा तुमचा बालेकिल्ला आहे. मात्र या वरळीमध्ये काय सुरू आहे, याची तुम्हालाच कल्पना नाही. दोन आमदारांना बळी देऊन तुम्ही वरळीत आमदारकी मिळवली. तुमचे जेथे वास्तव्य आहे त्या वांद्रे येथून का उभे राहिले नाही. अडीच वर्षांपासून तुमच्या मतदारसंघातील समाज (कोळी बांधव) वणवण फिरत होता. त्यांचं तुम्ही कधीच ऐकून घेतलं नाही,” अशी घणाघाती टीका शीतल म्हात्रे यांनी केली.
वरळी येथे घेतलेल्या सभेला गर्दी कमी नव्हती
तसेच वरळीतील कोळी समाजाचा संदर्भ देत वरळीमधील सभेला खुर्च्या रिकाम्या नव्हत्या असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. ” कोळी समाज पेटून उठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी येथे घेतलेल्या सभेला गर्दी कमी नव्हती. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने घेण्यात आला,” असे स्पष्टीकरण म्हात्रे यांनी दिले.
हेही वाचा >> Video : मोदी भाषणाला उभे राहताच संसदेत गदारोळ, विरोधकांकडून ‘मोदी-अदाणी भाई भाई’ म्हणत जोरदार घोषणाबाजी!
प्रेमापोटी हे लोक आलेले आहेत
तसेच ९ फेब्रवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानावर गर्दी केली होती. त्यावर बोलताना “वर्षा बंगल्यावर आलेली ही गर्दी जमवलेली नाही. मुख्यमंत्र्यांवर असलेल्या प्रेमापोटी हे लोक आलेले आहेत,” असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.