मालेगाव येथील सभेपूर्वी शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र, या टीकेला महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तेव्हापासून शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्वीटरवॉर रंगलं आहे. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टीप्पणी केली जात आहे. दरम्यान, या ट्विटरवॉर संदर्भात शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या ट्वीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
हेही वाचा – “लोकांना सांगतो, पटलं तर मत द्या, नाहीतर…”, नितीन गडकरींचं नागपुरात विधान
काय म्हणाल्या शीतल म्हात्रे?
“मी मालेगावच्या सभेवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मात्र, मिरच्या जितेंद्र आव्हाडांना झोंबल्या. त्यामुळे त्यांनी आता उद्धव ठाकरे गटाचं प्रवक्तेपद स्वीकारलं की काय असं वाटायला लागलं आहे. खरं तर त्यांना यासंदर्भात बोलण्याची काहीही गरज नव्हती. पण स्वत:चं महत्त्व वाढण्यासाठी हा उद्योग केला असावा”, अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली. दरम्यान, या ट्विटरवॉरच्या माध्यमातून वैयक्तिक टीका होतेय का? असं विचारलं असता, “ ”जेव्हा मुद्दे संपतात आणि बोलण्यासारखं काहीही उरत नाही, तेव्हा असा प्रकार घडतो. महिलांच्या चारित्र्यावर अशा प्रकारे बोलणं अतिशय सोप्पं असतं आणि तेच सातत्याने घडत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“आता तुम्हाला बायको, मुलगी आठवली नाही का?”
“काही दिवसांपूर्वी एका महिलेले विनयभंगाचा आरोप केला, तेव्हा तुमच्यावर अन्याय झाला असं म्हणत होता, मग आता एक महिलेविषयी असं बोलताना, तुम्हाला तुमची मुलगी आणि बायको आठवली नाही का? खरं तर काहीही कारण नसताना हे सर्व घडलं. एकप्रकारे खाजवून खरूज काढण्यासारखा हा प्रकार होता”, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा – “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट
दोघांमध्ये रंगलं ट्विटरवॉर
शीतल म्हात्रेंनी २५ मार्च रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या उर्दू भाषेतील बॅनरचा एक फोटो ट्वीट केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे गटाचा एक बॅनर ट्वीट केला. यावर पुन्हा शीतल म्हात्रेंनी “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्वीट चांगलंच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असं ट्वीट केलं.
आव्हाडांनीही त्यावर प्रत्युत्तर “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारं कृत्य मी करत नाही. आठवतंय ना? काय दे ढुं***, काय तो दांडा.. धूर कुठून निघाला?” असा खोचक सवाल विचारला. त्याला प्रत्युत्तर म्हणून “पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी.लगे रहो भाईजान”, असं शीतल म्हात्रेंनी म्हटल्यानंतर त्यावर “त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, असं खोचक ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं.