आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या तथाकथित व्हिडिओ घटनेसंदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज संपेपर्यत सभागृहात निवेदन देणायचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओत अशोभनीय बदल करून तो सोशल माध्यमातून अपलोड केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातला एक आरोपी ठाकरे गटाशी संबंधित आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
काय म्हटलं आहे शंभूराज देसाई यांनी?
११ मार्चला दहीसर हद्दीत मिठी नदीवरच्या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर बाईक रॅली काढण्यात आली होती. अशोकवन जंक्शन येथे आमदार प्रकाश सुर्वेंच्या भाषणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक रॅलीमध्ये प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्यातल्या संवादाचं मॉर्फिंग करून आणि प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओत चुकीचे बदल करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला असं निवेदन शंभूराज देसाई यांनी विधानसभेत वाचून दाखवलं.
यानंतर शीतल म्हात्रे यांनी दहीसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आयपीसी कलम ३४, ६७ अ, ६७ अ या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशोक राजदेव मिश्रा, मानस कुंवर, विनायक डावरे, रविंद्र चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल करून स्त्रीची बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणी चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. राज प्रकाश सुर्वे यांच्या तक्रारीवरून कलमं लावली आहेत. अश्लील व्हिडीओ व्हायरल करून एका स्त्रीबाबत अस्यभ वर्तन केलं आहे. त्यामुळेच आम्ही या प्रकरणी एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
माननीय न्यायालयाने या आरोपींना १५ मार्च २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोशल मीडिया अकाउंटद्वारे घृणास्पद व अश्लील व्हिडिओ व्हायरल करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्याद्वारे संबंधिताची बदनामी केल्याचे दिसून येते. यामध्ये चार मोबाईल हँडसेट व पाच मायक्रो सिम कार्ड जप्त केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान यातील आरोपींनी संबंधित व्हिडिओची एडिटिंग व मॉर्फिंग केल्याचे दिसून येते. तसेच, यातली आरोपी विनायक भगवान डावरे हा ठाकरे गटाशी संबधीत असून त्याने मातोश्री या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ जाणीवपूर्वक काही व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केला. सदरचे कृत्य गंभीर असून याबाबत तपासासाठी सहा पोलिस अधिकारी यांची टीम तपास करत आहे.