सध्या अटकेत असलेले पुण्याचे शीतल साठे व सचिन माळी यांनी उत्तर गडचिरोलीच्या जंगलात सक्रिय असताना नक्षलवाद्यांनी अबुजमाड पहाडावर आयोजित केलेल्या दंडकारण्य विभागाच्या अधिवेशनातसुद्धा सहभाग नोंदवला होता, अशी माहिती सध्या तुरुंगात असलेल्या एका नक्षलवाद्याच्या जबाबातून समोर आली आहे.
शाहीर व विद्रोही कवी असलेले शीतल साठे व सचिन माळी यांना पोलिसांनी नक्षलवादी ठरवल्यावरून सध्या राज्यात मोठे वादळ उठले आहे. हे दोघेही नक्षलवादीच आहेत, असा दावा करणाऱ्या पोलिसांनी त्याच्या समर्थनार्थ अनेक पुरावे देणे सुरू केले आहे, तर पुरोगाम्यांचे वर्तुळ या दोघांना फसवले जात आहे, असा आरोप करत आहे. या पाश्र्वभूमीवर आता नव्याने समोर आलेली माहिती साठे व माळी यांच्या चळवळीतील सक्रिय सहभागात आणखी भर घालणारी आहे. गेल्या वर्षी येथील पोलिसांनी चळवळीत अमर या नावाने वावरणाऱ्या नक्षलवाद्याला अटक केली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमरने दिलेला जबाब खळबळजनक आहे. पुण्याच्या कबीर कला मंचमध्ये कार्यरत असतानाच हे दोघे नक्षलवादी चळवळीचे काम करत होते. काही महिने उत्तर गडचिरोलीच्या जंगलात वास्तव्य केल्यानंतर हे दोघेही परत पुण्याला गेले. तेथून ११ मार्च २०१० ला साठे व माळी यांना घेऊन अँजेला सोनटक्के महाराष्ट्र एक्स्प्रेसने गोंदियाकडे निघाले. त्या वेळी अमर त्यांच्या सोबत होता. गोंदियाला उतरल्यानंतर या चौघांनी भाडय़ाच्या वाहनाने उत्तर गडचिरोलीतील कोटगुल या गावातून जंगलात प्रवेश केला. तिथे दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेची भेट झाल्यानंतर हे सर्वजण अबुजमाड पहाडावर दंडकारण्य स्पेशल झोन समितीने आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी रवाना झाले. या पहाडावर नक्षलवाद्यांचा मुख्य तळ आहे. या तळावर आयोजित होणाऱ्या अधिवेशनात केवळ निवडक सदस्यांनाच प्रवेश दिला जातो.
सहा दिवस चाललेल्या या अधिवेशनात साठे व माळी या दोघांची ओळख सर्वाशी करून देण्यात आली. हे दोघेही भाकप माओवादी या पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असून, या दोघांवर पुणे व मुंबईत चळवळ सक्रिय करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे असे अधिवेशनात जाहीर करण्यात आले. याच अधिवेशनात अँजेला सोनटक्केला राज्य समितीची सदस्य म्हणून दर्जा देण्यात आला. अँजेलासोबतच आंध्र प्रदेशात सक्रिय असलेल्या आनंदलासुद्धा हाच दर्जा देण्यात आला. सध्या हा आनंद आंध्र पोलिसांच्या ताब्यात आहे. या अधिवेशनानंतर अँजेला, साठे व माळी परत पुण्याला आले. यानंतर साठे व माळी यांनी कबीर कला मंचमध्ये सक्रिय असलेल्या मधू व विश्वा या दोन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुन्हा गोंदिया व उत्तर गडचिरोलीच्या जंगलात प्रवेश केला. या दोघांनी सोबत आणलेल्या मधूला राज्य समितीचा सचिव मिलिंद तेलतुंबडेने ५० हजार रुपये देऊन पुण्याहून एक झेरॉक्स मशीन आणण्याची जबाबदारी सोपवली.
हा घटनाक्रम २०१० च्या नोव्हेंबर महिन्यातला आहे. पैसे घेऊन पुण्याला आलेला मधू मशीनच्या शोधात असतानाच दहशतवाद विरोधी पथकाने अँजेला सोनटक्केला अटक केली. त्यानंतर मधू भूमिगत झाला. परिणामी, नक्षलवाद्यांनी जंगलात मागवलेली झेरॉक्स मशीनसुद्धा पोहोचू शकली नाही. अँजेलाच्या अटकेमुळे तिचा पती मिलिंद अस्वस्थ झाला. त्याने साठे व माळी यांना पुण्यात जाऊन घटनाक्रमावर नजर ठेवा आणि हस्तकामार्फत पत्र पाठवा, असे निर्देश दिले. त्यानंतर साठे व माळी पुण्यात आले व भूमिगत राहून चळवळीचे काम करू लागले, असा जबाब अमरने पोलिसांकडे दिला आहे.

साठे व माळी यांना गडचिरोलीत चौकशीसाठी आणण्यात आल्यानंतर जबाब देणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना त्यांच्यासमोर हजर करण्याची योजना पोलिसांनी तयार केली आहे. या आमनेसामने होणाऱ्या चौकशीतून बरेच काही बाहेर पडेल, असा पोलिसांचा दावा आहे.

Story img Loader