महाराष्ट्राचे श्रध्दास्थान संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या शेगांव संत नगरीत दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्यातून लाखो भाविक येत आहे. गर्दीने उच्चांक केला असून भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी गजानन महाराज संस्थान नेहमीसारखेच नव्या जोमाने तत्पर दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्टीत दररोज किमान एक लाख भाविक व पर्यटक येत असल्याने शेगावात भक्तांचा महासागर दिसून येत आहे.
दिवाळीच्या सुट्टय़ा आणि जोडून आलेला शनिवार रविवार यामुळे दिवाळीच्या आनंदाचा गोडवा वाढविण्यासाठी भाविक भक्तांनी शेगाव निवडले आहे. सहकुटूंब सहपरिवार भाविक व पर्यटक शेगांवला येत आहे. नगर परिषदेपासून तर मंदिरापर्यंत हजारो वाहनांची येथे गर्दी झाली आहे. समाधी स्थळावरील गर्दी प्रमाणेच पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या आनंदसागरमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. शेगाव संस्थानने आनंद सागर आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले आहे. फुलां फळांनी डवरलेले बागबगिचे, आनंद सागर तलाव, विवेकानंद ध्यान केंद्र, मत्स्यालय, बच्चे कंपनीसाठी खेळ पर्यटन, झुक झुक आगीनगाडी , उपहार गृह व फराळाची केंद्रे अशा अनेक पर्यटकीय सेवा सुविधांनी आनंद सागर आधुनिक वृंदावन झाले आहे. पर्यटकांना आनंद सागरची प्रचंड ओढ आहे. त्यामुळे श्रीच्या दर्शनाला आलेले पर्यटक हे आनंद सागरची भटकंती करतात.
श्री गजानन महाराज संस्थानने भाविक भक्तांसाठी निवास व भोजनाची स्वस्त दरात सोय केली आहे. भक्तांच्या सेवेसाठी पाच हजार सेवाधारी कार्यरत आहेत. एस.टी. बसस्थानक व रेल्वे स्टेशनवरही तोबा गर्दी आहे. स्थानिक पोलिस व रेल्वे पोलिस बंदोबस्तासाठी सतर्क झाले आहेत. अलिकडच्या काळात शिर्डी व पंढरपूर नंतर शेगांव हे भाविकांच्या गर्दीचे प्रमुख केंद्र झाले आहे. लाखो लोक संतश्रेष्ठ गजाननाच्या दर्शनासाठी येतात. भक्तांच्या देणगीतून संस्थानकडे दरवर्षी शंभर क ोटी रुपये येतात. हा संपूर्ण पैसा संस्थान भक्तांच्या सोयी सुविधा व सेवा कार्यात खर्च करते. येथे संचयाची कार्यपध्दती नसून हा पैसा सेवा कार्यासाठी उपयोगात आणला जातो. संस्थानचे सध्या एकूण ४२ सेवा प्रकल्प सुरू आहेत. शेगाव संस्थानचे मंदिर व्यवस्थापन व भक्तसेवेचे कार्य देशातील पहिल्या क्रमांकाचे आहे. देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनी संस्थानच्या सेवाव्रताचा नेहमीच गौरव केला आहे.
संस्थानचे सेवा कार्य चोख असले तरी राज्य शासनाच्या वतीने राबविला जाणारा शेगांव विकास आराखडा अतिशय मंद गतिने सुरू आहे. या विकास आराखडयावर नियंत्रक असलेले तीन विभागीय आयुक्त येऊन गेल्यानंतरही गेल्या तीन वर्षांत विकास आराखडयात फारशी प्रगती नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आराखडयातील अनागोंदी, भ्रष्टाचार व गैरव्यवहाराने कळस गाठला आहे. विकास आराखडयाच्या कासव गतीबद्दल शेगांवकर नाराजी व्यक्त करीत आहेत. शासनाने शेगांव नांदेडच्या धर्तीवर विकसित करावे, अशी भाविकांची मागणी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
संतनगरी शेगावात पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक
महाराष्ट्राचे श्रध्दास्थान संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या शेगांव संत नगरीत दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्यातून लाखो भाविक येत आहे. गर्दीने उच्चांक केला असून भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी गजानन महाराज संस्थान नेहमीसारखेच नव्या जोमाने तत्पर दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-11-2012 at 06:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shegaon full of tourists