दोन वेळा आमदारकी व आता खासदारकीसाठी भवितव्य आजमावणाऱ्या आमदार संजय जाधव यांनी सध्या ‘वरपूडकर फॉर्म्युला’ अवलंबिला आहे. जाधव हे खासदार झाल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या भाबडय़ा आशेने सध्या शिवसेनेत किमान अर्धा डझन पदाधिकारी कामाला लागले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवताना माजी मंत्री वरपूडकर यांनी हा फॉम्र्युला अवलंबिला होता.
जाधव यांना पक्षाने बढतीची संधी दिली. जाधव खासदार झाले, तर परभणी विधानसभा मतदारसंघाचे उत्तराधिकारी आपणच, या जिद्दीने काही पदाधिकारी कामाला लागले आहेत. मी लोकसभेत गेलो तर संधी तुम्हालाच, असे उमेदवाराकडून खासगीत यातल्या प्रत्येकालाच आश्वासन दिल्याचे समजते. सध्या परभणी विधानसभा मतदारसंघात अजित वरपूडकर, डॉ. राहुल पाटील, गजानन देशमुख आदी दावेदार सेनेकडून आहेत. ही यादी आणखी मोठी होऊ शकते. सध्या यातल्या प्रत्येकालाच आपल्याला विधानसभा मिळेल, अशी आशा वाटू लागली आहे. त्यामुळे आपापल्या भागात जाधव यांना मताधिक्य देण्यास हे सर्व कामाला लागले आहेत.
डॉ. राहुल पाटील लोकसभेसाठी इच्छुक होते. युवा सेनेच्या माध्यमातून उमेदवारी मिळेल, असे त्यांना वाटले होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला; पण आता आपल्यासाठी विधानसभा मतदारसंघ खुला होईल, अशी त्यांना आशा आहे. त्याच जिद्दीने अजित वरपूडकरही ग्रामीण भागाचे दौरे करू लागले आहेत. हे दौरे चालू असताना एका अर्थाने आपलाही जनसंपर्क होत आहे, असे यातल्या प्रत्येक दावेदाराला वाटू लागले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने सुरेश वरपूडकर यांनी ३ वेळा लोकसभेची निवडणूक लढवली व ते पराभूत झाले. वरपूडकर सिंगणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते, तेव्हा सर्व प्रमुख कार्यकत्रे साहेब खासदार झाल्यानंतर आपल्यालाच विधानसभेची जागा मिळेल, या जिद्दीने कामाला लागले. व्यंकटराव कदम, धोंडीराम चव्हाण, रामभाऊ घाटगे अशी वरपूडकर समर्थकांची मोठी यादी त्यावेळी होती. आता सिंगणापूर मतदारसंघ लुप्त झाल्यानंतर पाथरी मतदारसंघाशी वरपूडकर जोडले गेले. त्यांनी लोकसभा लढवली, तेव्हा त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचे वारस म्हणून अनेकजण जिद्दीने कामाला लागले. प्रत्यक्षात वरपूडकरांना राष्ट्रवादी स्थापनेनंतर लोकसभेच्या निवडणुकीत सलग ३ वेळा पराभव सहन करावा लागला. सध्या जाधव यांना हा ‘वरपूडकर फॉम्र्युला’ कामाला येत असून शिवसेनेतले अनेक पदाधिकारी परभणी विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून जाधव यांच्या खासदारकीच्या प्रचारासाठी झटत आहेत.

Story img Loader