रायगड हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला. पण रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीत अलिबागवगळता अन्यत्र सर्व प्रभागांमध्ये शेकापला उमेदवारही सापडलेले नाहीत. पक्षाचा जनाधार कमी होत असल्याची ही लक्षणे मानली जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेकापने जम बसविला तो पूर्वीच्या कुलाबा म्हणजे रायगड जिल्ह्य़ात. नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दि.बा.पाटील, मोहन पाटील यांसारखे दिग्गज नेते या जिल्ह्य़ातील. यापैकी दत्ता पाटील आणि दि. बा. पाटील यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही भूषविले. राज्याच्या राजकारणात रायगडच्या पाटील मंडळींनी आपली छाप पाडली होती. पुढच्या पिढीतील जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, धर्यशील पाटील, बाळाराम पाटील आणि सुभाष पाटील यांनी पक्षाची धुरा समर्थपणे संभाळली आहे. जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांची भक्कम फौज पक्षाच्या पाठीशी नेहमीच राहिली आहे. जिल्ह्य़ात आजही शेकापचे तीन आमदार आहेत. यात दोन विधानसभेच्या तर एक विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेवर पक्षाची पकड कायम आहे. जिल्हा बँक आणि सहकारी संस्था, बाजार समित्यावर शेकापने कायमच वर्चस्व राखले आहे.

अलिबागवगळता एकाही नगरपालिकेसाठी संपूर्ण जागावर उमेदवार शेकापला उभे करता आलेले नाहीत, ही एक चिंतेची बाब मानली जाते. स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या आघाडय़ा हे या मागचे कारण सांगण्यात येत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. अलिबाग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह सर्व १८ जागांसाठी पक्षाने उमेदवार दिले आहेत. तर पेण, रोहा, महाड, माथेरान या नगरपालिकासाठी पक्षाने उमेदवारच दिलेले नाहीत. खोपोली नगरपालिकेच्या २९ जागांसाठी १३, उरणमध्ये सात तर श्रीवर्धन येथे पक्षाने केवळ एकच उमेदवार उभा केला आहे. अनेक ठिकाणी पक्षाची ताकद असूनही उमेदवारच उभे केलेले नाहीत. याचा फटका पक्षाला बसणार आहे. कारण नगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर पक्षाला एकहाती सत्ता मिळेल अशी अलिबाग नगरपालिकावगळता एकही नगरपालिका असणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश जाऊ शकतो. निवडणुकीपूर्वीच पक्षाने उमेदवार उभे करण्याचे टाळून तलवार म्यान केल्याचे मानले जाते. अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, मुरुड, उरण हे तालुके शेकापचे वर्चस्व असणारे तालुके म्हणून ओळखले जातात. शहरी भागात पक्ष काहीसा मागे पडत असतो. त्यामुळे शहरी भागांकडे पक्षनेतृत्वाने यावेळी फारसे लक्ष दिलेले नाही.  नगरपालिका आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादीसोबत लढण्याची घोषणा पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली होती. त्याप्रमाणे दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळ्यांवर आघाडी केली. मात्र उमेदवारी देताना शेकापला अलिबागवगळता सर्वत्र दुय्यम स्थान मिळाल्याचे या उमेदवारांच्या आकडय़ांमुळे स्पष्ट झाले आहे.

स्थानिक पातळ्यांवर केलेल्या आघाडय़ांमुळे काही ठिकाणी ताकद असूनही पक्षाला उमेदवार देता आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र या जिल्ह्य़ातील नगरपालिकांचा इतिहास लक्षात घेतला तर पनवेल, अलिबाग या नगरपालिकावगळता पक्ष इतर ठिकाणी फारसे उमेदवार उभे करीत नाही. १९९५ नंतर शेकापने नगरपालिका निवडणुका लढवण्यास सुरुवात केली आहे आणि उमेदवारांची संख्या प्रत्येक वेळी वाढत आहे.

आमदार जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस  

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shetkari kamgar paksha suffering problem in alibaug for election candidate