साधारणपणे निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी श्वेतपत्रिका काढतात. आगामी काळात करू इच्छिणाऱ्या कामांचा आणि आजवर केलेल्या कामाचा यात ऊहापोह केला जातो. रायगडची निवडणूक मात्र याला अपवाद ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. कारण आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी इथे समोरच्या उमेदवाराच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढून प्रसिद्ध करण्याचा अजब प्रकार या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळते.
 रायगड लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे निवडणूूक लढवत आहेत, तर शेकापने त्यांच्या विरोधात रमेश कदम यांना उमेदवारी दिली आहे. साधारण परिस्थितीत शेकापने रमेश कदम यांच्या मतदारसंघ विकासाची संकल्पना आपल्या प्रचारपत्रिकेतून मांडणे अपेक्षित होते. मात्र शेकापने हा प्रघात मोडून काढला आहे. पारंपरिक प्रचार पद्धतीला फाटा देत पक्षाने विरोधकांच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली आहे. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या २५ हजार कोटींच्या मालमत्तेवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. तटकरे यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या कंपन्यांची यादी, कंपन्यांनी खरेदी केलेल्या जमिनी यांचे विवरण या श्वेतपत्रिकेतून करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील सिंचन प्रकल्प आणि त्यांच्या बांधकाम खर्चात झालेली वाढ आणि आजची परिस्थिती यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
     शेकापच्या या श्वेतपत्रिकेची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. तटकरे यांच्या विरोधात शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे सुरवातीपासूनच आक्रमक असल्याचे चित्र पाहायला मिळते. अंतुलेंची तटकरे यांच्यावर असणारी नाराजी ओळखून त्याचा फायदा शेकापने मिळवला. त्यानंतर सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवारही उभा केला. निवडणूक अर्ज छाननीत तटकरे यांचा अर्ज बाद व्हावा म्हणून प्रयत्न केले आणि आता तटकरे यांच्या मालमत्तेची श्वेतपत्रिका काढून प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे तटकरेंची कोंडी करण्याची एकही संधी शेकापने सोडली नसल्याचे सध्या दिसून येते.
दरम्यान शेकापची ही श्वेतपत्रिका म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी शेकापचे जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, जॉली पिंट्रर्स आणि शेकाप उमेदवार रमेश कदम यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अलिबाग शहर अध्यक्ष महेश मोहिते यांनी दिली आहे.

Story img Loader