लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं. या एनडीए आघाडीच्या सरकारला स्थापन होऊन काही महिने होत नाही तरच विरोधकांकडून सातत्याने केंद्रातील सरकार कधीही कोसळू शकतं, अशी टीका केली जात आहे. आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रातील एनडीए सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या शेतकरी कामगार पक्षाचं पंढरपूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. “दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे”, असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“शेतकरी कामगार पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशनाला शरद पवार येणार होते. मात्र, ते दिल्लीत आहेत. परवा दिवशी शरद पवारांनी मला फोन केला होता. ते म्हणाले, माफ करा मी शेतकरी कामगार पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला येऊ शकत नाही. मी आता दिल्लीला आहे. एका महिन्यात मोठी राजकीय उलाढाल होत आहे. त्यामुळे मला माफ करा, मी येऊ शकत नाही, असं ते (शरद पवार) मला म्हणाले. मी त्यांना म्हणालो की, तुम्ही सरकार पाडा आणि या आम्ही तुमचं स्वागत करू. आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की, त्या अनुषंगाने वाटचाल सुरु आहे”, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं.

हेही वाचा : Shivraj Singh Chauhan : “काँग्रेसला कायम शकुनी, द्यूत आणि चक्रव्यूह यांचीच आठवण का येते?” राज्यसभेत शिवराज सिंह चौहान यांची टोलेबाजी

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी केंद्र सरकारबाबत केलेल्या विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले, “कोण कोणाच्या मेळाव्याला जात आहे की जात नाही, हा विषय आमचा नाही. मात्र, दिल्लीच्या राजकारणात ते बोलले तसं काहीही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएमधील सर्व पक्षांनी मिळून पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकार खूप चांगल्या योजना देत आहे, यापुढेही देणार आहे. महाराष्ट्रात आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना यासह शेतकऱ्यांना वीज बील माफी, अशा अनेक योजना आणल्या आहेत. हे सर्व पाहून विरोधक हतबल झाले आहेत”, अशी टीका करत प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली.

Story img Loader