पै-पै उभा करून सहकारी साखर कारखाने उभे राहिले, मात्र त्याचा मालक असणारा शेतकरी आज गुलाम झाला आहे. गुन्हेगारांनी त्यांचा विभाग वाटून घ्यावा त्याप्रमाणे कारखान्यांनी विभाग वाटून घेतले. बाजार समित्या व जिल्हा बँकाही राजकारण्यांसाठीच चालत असल्याने शेवटी शेतकऱ्याला सावकाराकडेच जावे लागते, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमामध्ये ‘शेती आणि सहकार’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. शेती अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे, शेती तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनीही या सत्रामध्ये सहभाग घेतला.
फोटो गॅलरीः बदलता महाराष्ट्र
शेट्टी म्हणाले की, सहकार ही विशिष्ट घराण्याची मालमत्ता झाली आहे. सहकारातील माणसे सहकार मोडून खायचा, असे ठरवूनच त्यात गेल्याने सहकार यशस्वी होत नाही. शेतीसाठी सहकार गरजेचा आहे, पण त्याला व्यावसायिक स्वरूप असू नये. सहकारात वाईट प्रवृत्ती शिरल्याने शेती व्यवसाय मोडकळीस आला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शिवारापासून बाजारापर्यंत सर्व गोष्टींचा पुनर्विचार व नियोजन गरजेचे आहे.
सहकाराबाबत मुळीक म्हणाले की, सहकाराबाबत माझे मत वाईट नाही, पण तितके चांगलेही नाही. सहकारी संस्थांनी नुकसान केले असे नाही. विखे- पाटलांनी सहकाराचा आदर्श घालून दिला आहे. पाण्यात घाण असली की ती नेहमी वर दिसते. पण, पाणी खराब नसते. सहकारातील ही घाण वर आल्यानेच या क्षेत्रात असे चित्र निर्माण झाले आहे.
आपटे म्हणाले की,  एकत्रिकरणाचे रूप शेतीत शक्य असेल व तिथे परवडत असेल, तर सहकार करावा. अनेक ठिकाणी काही लोक एकत्रित येऊन स्वत:च्या व्यावसायिक शक्तीवर उभे राहिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनीही फायदा मिळेल त्या तत्त्वानुसार एकत्र आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेळी सरकारच्या दावणीला बांधण्याची गरज नाही.