अहिल्यानगर : अफूची शेती केल्याचा प्रकार शेवगाव पोलिसांनी बोधेगाव शिवारात (ता. शेवगाव, अहिल्यानगर) येथे उघडकीस आणला. शेतात लागवड केलेली अफूची ९५३ लहान-मोठी झाडे, त्यास बोंडे असलेली, वजन ३९.६८५ किलो जप्त केली. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार ६०० रुपये आहे. शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यासंदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात पोलिस अंमलदार श्याम बाबासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश नवनाथ घोरपडे (२२, रा. मारुतीवस्ती, बोधेगाव, शेवगाव) याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश घोरतळे याला अटक करण्यात आली आहे.
राज्यात शासनाने अफूच्या लागवडीस बंदी घातली आहे. मात्र गणेश घोरतळे याने त्याच्या मालकीच्या, बोधेगाव शिवारातील गट क्रमांक ४५१ मध्ये सुमारे ४ गुंठे क्षेत्रात अफूच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी फौजफाटा व पंचासह तेथे छापा टाकला.पंचनाम्यामध्ये बेकायदा लागवड केलेली अफूची ९५३ लहान-मोठी झाडे आढळली. त्याला बोंडे लागलेली होती. त्याचे वजन ३९.६८५ किलो आहे.
त्याची किंमत एकूण ११ लाख ४३ हजार ६०० रुपये आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागरे, सहायक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे व अशोक काटे, अंमलदार चंद्रकांत भुसारे, किशोर काळे, श्याम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, भगवान सानप, प्रशांत आंधळे, एकनाथ गरकळ, संपत खेडकर, महिला पोलीस अंमलदार प्रियंका निजबे तसेच सायबर पोलीस ठाण्यात येथील अंमलदार राहुल गुंडू, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुंदरडे करत आहेत.