पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने कारवाई केली. कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली आहेत. राज्य शिखर बँकेकडून विठ्ठल कारखान्याने कर्ज घेतले होते. मात्र, त्याची परतफेड न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. आधीच्या संचालक मंडळाने हे कर्ज काढले असून, यात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत लवकरच तोडगा काढू, असे कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कारवाई झाल्याने अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेली अनेक वर्षे तोटय़ात होता. या आधीच्या संचालक मंडळाने शिखर बँकेकडून जवळपास ४५० कोटी रुपये कर्ज थकीत होते. कराराप्रमाणे या कर्जाची परतफेड न केल्याने शिखर बँकेने कारवाई केली. याबाबत कारखान्याने पुण्यातील डीआरटी कोर्टात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने जप्तीच्या कारवाईला २५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. ही मुदत संपताच दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कारखान्यातील साखरेची तीन गोदामे सील करण्यात आली. दरम्यान, या कारखान्यावर अभिजित पाटील यांनी सत्तांतर करून तोटय़ातील कारखान्याला ऊर्जितावस्था आणली आहे.

हेही वाचा >>>सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी पादचाऱ्याचा खून

यंदा विठ्ठल कारखान्यात विक्रमी असे १० लाख टन गाळप झाले आहे. तसेच वीजनिर्मिती व इतर सहप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने कारखान्याची विस्कटलेली आर्थिक घडी बसू लागली होती. तसेच या काळात कारखान्यातील कामगारांचे थकीत वेतन व इतर देणी अभिजित पाटील यांनी दिली. बँकेने कर्जाच्या २५ टक्के म्हणजे १२५ कोटी रुपये भरण्याचे सांगितले. मात्र जुन्या संचालक मंडळांनी घेतलेले कर्ज आहे. यात भ्रष्टाचार झाला आहे. असे असताना ही कारवाई झाली. याबाबत फडणवीस, अजित पवार यांची भेट घेऊन तोडगा काढू, असे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले. अभिजित पाटील हे शरद पवार गटात आहेत. ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सहभागी आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar bank action against vitthal cooperative sugar factory amy
Show comments