लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसला आहे. पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंना पाठवला आहे. मुंबई कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर मनमानी करत आहेत. त्यांनी संघटना विस्कळीत केली आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या शब्दालाही त्या किंमत देत नाहीत असाही आरोप शिल्पा बोडखेंनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं

माझं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मला वर्षभरापासून त्रास दिला जातो आहे. मनिषा कायंदे यांनीही मला वर्षभर त्रास दिला आहे. आता विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या दोघींनी त्यांची तूट भरुन काढत मला त्रास दिला आहे. माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं आहे असा आरोप विशाखा बोडखेंनी केला आहे.

माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…

माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे… मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच पुन्हा नागपुरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा…

हे पण वाचा- शेतकऱ्यांना हमीभाव नाही अन् गद्दारांना ५० खोक्यांचा भाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात

काय म्हटलं आहे शिल्पा बोडखेंनी राजीनामा पत्रात?

आपण शिवेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटतं.

शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत.

मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे.

जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद.

पुढे कोणाचे असेल राजकीय आयुष्य बरबाद करून नका, नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठिशी उभा राहणार नाही. कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चहाड्या करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa bodkhe resignation letter to shivsena uddhav thackeray from spokesperson east vidarbha sampark pramukh nagpur scj
Show comments