ओबीसी आणि मराठा समाजात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणामुळे वाद निर्माण झाले आहेत. दोन्ही समाजातील नेत्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यातच, सत्ताधारी मंत्री छगन भुजबळ यांनी तर ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून न देण्याचा पण केला आहे. यावरून छगन भुजबळांविरोधात त्यांच्याच मंत्रिमंडळातील नेते त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांना शिवीगाळ केल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्या कथित शिवीगाळप्रकरणी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी घटकपक्षांतच वाद रंगण्याची शक्यता आहे.
संजय गायकवाड आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद काय?
छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने संजय गायकवाड म्हणाले, “एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा.” संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सरकारमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यावरूनच अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
“संजय गायकवाड यांनी मा.ना.भुजबळसाहेब यांच्याबद्दल जे अश्लाघ्य व उर्मट वक्तव्य केले आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. त्यांच्या सातत्याच्या अशा वक्तव्यांनी बुद्धीहीन वैचारिकतेचे प्रदर्शन मांडले आहे,त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते. असे लोकप्रतिनिधी सभागृहात असणे दुर्दैवच म्हणावे लागेल. तरी मुख्यमंत्री महोदयांनी संजय गायकवाड यांना ‘समजेल’अशा भाषेत समज द्यावी”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
दरम्यान, संजय गायकवाडांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे. तसंच, सरकारमध्येच वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.