‘निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये,’ असा अर्ज ६ सप्टेंबरला ( मंगळवारी ) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यावर आज ( ७ सप्टेंबर ) न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावरती आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर उत्पादक शुल्क मंत्री, आमदार शंभूराजे देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल याचा आजही विश्वास आहे. कारण बहुमतातील शिवसेना आमची आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, सरपंचाचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह हे आम्हाला मिळालं पाहिजे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार निवडणुकांना सामोरे आम्ही जाऊ. जर चिन्ह गोठावलं तर सर्व बाजूंनी आमची तयारी आहे,” असे शंभूराजे देसाईंनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“मनसेसोबत युती झाली तर हातात हाथ…”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार का? असा सवाल शंभूराजे देसाईंना विचारला. तेव्हा ते म्हणाले की, “हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. संघटना आणि ४० आमदारांच्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना दिले आहेत. राज ठाकरेंसोबत युतीचा निर्णय झाला तर, हातात हात घालून काम करू,” असेही शंभूराजे देसाई म्हणाले.
“दसरा मेळावा आमचाच होणार”
शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा घेणार का? यावरती शंभूराजे देसाईंनी सांगितलं, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही खरे वारसदार आहोत. त्यामुळे दसरा मेळावा हा आमचाच होणार आहे. ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना म्हटलं आहे की, शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा झाला पाहिजे.” तसेच, राज ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणार का? असे विचारले असता, “तो निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे,” असे स्पष्टीकरण शंभूराजे देसाईंनी दिलं आहे.