शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्यासंदर्भातील याचिकेवर मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळळी आहे. तर, शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यातच शिंदे गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी म्हटलं की, “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर व्हावा, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. तरीही या निर्णयामागील कारणे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरु आहे.”
हेही वाचा – शिवाजी पार्कचं मैदान शिवसेनेनं मारलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “न्यायालयाने…”
“बिकेसी मैदानाची परवानगी असली तरीही आपण शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी आग्रही आहोत. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, काहीही झालं तरीही हिंदुत्वाचा हुंकार आणि खरा विचार जाणून घेण्यासाठी भव्य असा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल,” असेही किरण पावस्कर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – “मोदीजी चित्त्याचा फोटो काढला, वाघाचा फोटो काढण्यासाठी दसऱ्याला शिवतीर्थावर या”
सदा सरवणकरांचा अर्ज फेटाळला
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या वादाचा दसरा मेळाव्याच्या आयोजनाशी संबंध नाही, असं सांगत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा हस्तक्षेप अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.