शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी निकाल दिला. या निकालानुसार ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटालाही नार्वेकर यांचा एक निर्णय मान्य नाही असं दिसतंय. कारण शिंदे गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गेल्या वर्षी जून २०२२ मध्ये शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला तसेच आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपाबरोबर हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. दरम्यान,उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली होती. परंतु, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. तसेच पक्षाचं चिन्हदेखील शिंदे गटाला बहाल केलं. परिणामी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी ११ मे रोजी सुनावणी केली. या प्रकरणाचा निकाल देताना सरन्यायाधीश म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजीनामा दिल्याने त्यांचं सरकार पुन्हा बसवता येणार नाही. तसेच सरन्यायाधीशांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घटनेतील नियमानुसार विधानसभा अध्यक्षांवर सोपवला.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना मर्यादित कालावधीत निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, या जून महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. परंतु, ही सुनवाणी अखंडित होऊ शकली नाही. सुनावणीला वेग यावा आणि लवकर निकाल लागावा यासाठी ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा मर्यादित काळात निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सुनावणी सुरू झाली. दोन्ही गटांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर याप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता होती. पंरतु, राहुल नार्वेकर यांनी पुन्हा वेळ वाढवून मागितला. राहुल नार्वेकरांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आणि १० जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, बहुप्रतिक्षित अशा या निकालाचं वाचन १० जानेवारी रोजी मुंबईतील विधानभवनात झाले.
हे ही वाचा >> Girish Kuber on Disqualification Result: आमदार अपात्रता निकालावर गिरीश कुबेर यांचं परखड विश्लेषण
राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. तसेच शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवलं. त्याचबरोबर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. आता शिंदे गटाने नार्वेकरांच्या याच निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. शिंदे गटाने मागणी केली आहे की, शिवसेनेच्या ठाकरे गटातील १४ आमदारांना अपात्र ठरवावं. यासंबंधी त्यांनी याचिका दाखल केली आहे. पीटीआयने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.