अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यापासून शिंदे गटाकडून पुन्हा त्यांना अर्थमंत्रीपद देण्याला विरोध सुरू झाला. मात्र, अखेर नव्याने झालेल्या खातेवाटपात पुन्हा एकदा अर्थखातं अजित पवारांकडेच गेलं आहे. आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी या खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१४ जुलै) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “हे युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देताना देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास आणि या सरकारचा विकास पाहून राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिला आणि आमच्या सरकारमध्ये आले.”
संजय राठोडांचं खातं का काढलं?
संजय राठोडांचं खातं का काढलं? यावर दीपक केसरकर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसला जी खाती हवी होती ती खाती ज्यांच्याकडे होती त्यांना विचारलेलं असणार आहे. संजय राठोड आणि माझी भेट झालेली नाही. परंतू अब्दुल सत्तार यांची भेटी झाली होती. त्यांनी सांगितलं की, कृषी खातं राष्ट्रवादीला दिलं तर चालेल का असं त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं.”
हेही वाचा : अन्न व नागरी पुरवठा खातं मिळाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“आम्ही आपआपसात समजुतीने सगळं करतोय”
“याचा अर्थ विचारून खाती घेतली आहेत. आम्ही आपआपसात समजुतीने सगळं करत असू तर माध्यमांनी त्यात संशय घेण्याचं काही कारण नाही. अब्दुल सत्तार हे त्यांच्या मतदारसंघातून अनेक वर्षांपासून प्रचंड बहुमताने निवडून येतात. यापुढेही ते निवडून येतील. त्यांना जे खातं दिलं गेलं ते यापुढेही चांगलं चालवतील याची मला खात्री आहे,” असंही केसरकरांनी नमूद केलं.