मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपात जातील, असा मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे. हा दावा करताना शिरसाटांनी चव्हाण भाजपात का जातील याची कारणंही सांगितली. ते सोमवारी (३ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय शिरसाट म्हणाले, “ही वज्रमूठ नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी मंचावर बसले होते. हे कधीही एक होणार नाहीत. त्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नाहीत. ते एवढे आजारी होते का की, सभेला आले नाहीत. आज तेच नाना पटोले सुरतला कोर्टात चालले आहेत.”

“अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील”

“काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही, असं एकंदर दिसत आहे,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

“बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत, कारण…”

संजय शिरसाट पुढे म्हणाले, “अशोक चव्हाण भाजपात जातील असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत. बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत, कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे.”

हेही वाचा : शरद पवारांचं नाव घेत ठाकरे गटाच्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, “ते म्हणाले होते की…”

“…तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील”

“विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले, तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील. असं त्यांचं उलटं पालटं गणित आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत साशंकता आहे. असं असलं तरी अशोक चव्हाण यांची मानसिकता झाली असावी. ते निश्चितपणे भाजपात प्रवेश करतील,” असंही शिरसाटांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction leader big claim say ashok chavan will join bjp before loksabha election pbs
Show comments