राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटातील नेत्यांकडून अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विविध आरोप केले जात आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये शरद पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. पण शरद पवारांनी अचानक माघार घेतली, असं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अलीकडेच केलं आहे. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शरद पवारांवर टीकास्र सोडलं.
शरद पवार यांनी कशाप्रकारे आपल्याच पक्षातील लोकांचे राजकीय बळी घेतले? हे आता त्यांच्याच घरातील लोक सांगत आहेत. त्यामुळे यावर आता दुसऱ्यांनी बोलून काही उपयोग नाही, अशा आशयाचं विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या चर्चेवर भाष्य करताना संजय गायकवाड म्हणाले की, “यांचं (शरद पवार) सगळं ठरलं होतं. २०१४ लाही राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता भाजपाला पाठिंबा दिला होता. ते सगळं शरद पवारांनीच केलं होतं. आता त्यांच्या घरातील लोकच सांगतायत की आमचा नेता आमच्या लोकांचा कशाप्रकारे राजकीय बळी घेत होता. त्यामुळे दुसऱ्यांनी बोलून आता काही उपयोग नाही.”
हेही वाचा- सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडेंना दिली मदतीची हाक; म्हणाल्या, “भाजपाला जमत नसेल तर मी…”
“शरद पवार नेमकं काय बोलतात, काय करतात आणि काय करायला लावतात? हे कुणालाही कळत नाही. त्यामुळे यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास कधीही बसणार नाही,” असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला.