ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच “हे ढेकूण चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल,” असा हल्ला चढवला. यावर आता शिंदे गटाचे नेते, आमदार गुलाबराव पाटील यांनी यांनी प्रत्युत्तर दिलं. ते सोमवारी (६ मार्च) जळगावमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाबराव पाटील म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करू नका, हिंमत असेल तर तुमच्या बापाचं नाव वापरा आणि मतदान मागून दाखवा, असं उद्धव ठाकरे आतापर्यंत पाच-सहावेळी म्हटले आहेत. याला एवढं महत्त्व देणं चुकीचं होईल. शेवटी महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती त्यांची संपत्ती नाही.”

“बाळासाहेब ठाकरे देशाची आणि हिंदू समाजाची संपत्ती”

“बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंचे वडील आहेत, हे मान्य आहे. मात्र, ते या देशाची आणि हिंदू समाजाची संपत्ती आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कुणीही वापरू शकतं,” असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“ठाकरे गटाला धनुष्यबाण घेऊन लढता येणारच नाही”

उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण घेऊन निवडणुकीच्या मैदानात येण्याचं आव्हान दिलं. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलंय. त्यामुळे त्यांना धनुष्यबाण घेऊन येता येणारच नाहीये. त्यांना जे चिन्ह दिलंय त्यावरच ते लढणार आहेत.”

“अजून वर्ष-दीड वर्ष बाकी आहे, आगे आगे देखो…”

“होळीच्या दिवशी मी त्यांच्यावर अधिक बोलणं उचित होणार नाही. परंतू ‘आगे आगे देखो होता हैं क्या’. अजून वर्ष-दीड वर्ष बाकी आहे,” असा सूचक इशाराही गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाला दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

खेडमधील गोळीबार मैदानात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, “निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नावं चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण, ही ढेकूण चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना आपलं कुटुंबीय मानलं, त्यांची आपल्यावर वार केले.”

हेही वाचा : VIDEO: “भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, तेव्हा…”, उद्धव ठाकरेंचा खेडमधील सभेत हल्लाबोल

“यांच्यात असे अनेक आहेत, ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही. मात्र, आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देण्याचे नव्हते. एक काळी टोपी वाला होता, आता गेला. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. तरीही गद्दारांच्या शेपट्या आतच. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction mla gulabrao patil answer uddhav thackeray criticism in khed speech rno news pbs