उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील ४० आमदारांना ५० खोके देऊन फोडण्यात आल्याचा आरोपाचा पुनरुच्चार केला असून याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांच्या वात्रट तोंडाला कंटाळून आमदारांनी उठाव केल्याचं म्हटलं आहे.
“आमदार खोके घेऊन फुटले नाहीत, तर संजय राऊत यांचं वात्रट तोंड, त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमता, घरातून चालणारं सरकार, मातोश्री, वर्षाचे दरवाजे बंद याला कंटाळून त्यांनी उठाव केला,” असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
“११ कॅबिनेट मंत्री सत्तेवर लाथ घालून जातात, तर याला फुटला, गद्दार कसं काय म्हणायचं. मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात. ते सोडून ५० खोक्यांसाठी जाणार म्हणता, आता संजय राऊतांना तेवढी तर अक्कल पाहिजे,” अशी टीका त्यांनी केली.
“आमदार म्हणून आम्ही जनतेसमोर कोणतं तोंड घेऊन जाणार होतो. तुम्ही मंदिरं बंद करुन टाकली, यात्रा, निवडणुका, गणेशोत्सव. नवरात्रोत्सव सगळं बंद करुन टाकलं होतं. हे सर्व काय चाललं होतं. हा पाकिस्तान आहे हिंदुस्थान. यामुळे सर्व आमदारांनी उठाव केला. हिंदुत्वाच्या विचाराशी प्रताडणा करु शकत नाही यामुळेच उठाव करण्यात आला.
संजय राऊत काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याविषयी विचारणा केली असता राऊतांनी खोचक टोला लगावला. “केंद्र सरकारने नवीन रेशनची पॉलिसी जाहीर केली आहे. गरिबांना रेशन देण्यासंदर्भात. त्यापद्धतीने राज्य सरकारने एसआयटीचं रेशन केलं आहे, म्हणजे मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात ४० आमदार ज्या पद्धतीने ५० खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता, त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. पण जे विषय पोलीस, सीबीआयनं संपवलेत, त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत. तुम्ही तोंडावर पडाल”, असं राऊत यावेळी म्हणाले.