ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना खेकड्याची उपमा दिली. माझं सरकार वाहून नाही गेलं, खेकड्यांनी धरण फोडलं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
खेकड्यांनीच चमत्कार करून दाखवला आहे. ते आता वाघाच्या भूमिकेत आहेत, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाष्य करताना संजय गायकवाड म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतून त्यांच्या मनातली मळमळ आणि जळजळ सगळी तोंडातून बाहेर पडताना दिसली. आपलं पद गेल्याचं खूप मोठं दु:ख उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. रोज एक-एक सहकारी त्यांना सोडून जात आहे. कुणीही त्यांच्याकडे शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे या मुलाखतीतून त्यांनी आपल्या मनातील मळमळ बाहेर काढली.”
खेकड्याची उपमा दिल्याबाबत विचारलं असता आमदार गायकवाड पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे हे आम्हाला जरी खेकडे म्हणतं असले तरी या खेकड्यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. हे खेकडे आता वाघाच्या भूमिकेत आहेत. आता आमचे मुख्यमंत्री आहेत. आमचे मंत्री आहेत. आम्ही संपूर्ण राज्याचा डोलारा सक्षमपणे सांभाळत आहोत. लोकांची कामं करत आहोत. आम्ही त्यांच्यासारखं घरात बसून नाही आहेत.”
हेही वाचा- “खेकड्यांना सांभाळलं असतं तर…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून केलेल्या टीकेलाही गायकवाड यांनी उत्तर दिलं. “केंद्रात भाजपाचं सरकार आहे. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे जर राज्याचे मुख्यमंत्री जात असतील, तर त्यात वावगं काय आहे? ते दिल्लीला गेले तर ते मुजरे करायला गेले, अशी टीका तुम्ही (उद्धव ठाकरे) करता मग तुम्ही सोनिया गांधींकडे जायचे तेव्हा किती मुजरे करायचे? हे तुम्ही विसरले आहात का?” असा सवालही गायकवाड यांनी विचारला.