राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरलं आहे. असं असतानाच आता शिंदे गटातील आमदारही या मुद्द्यावर आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी या मुद्द्यावरून शिंदे गट आणि भाजपात वितुष्ठ निर्माण होऊ शकतं, असा थेट इशारा दिला आहे. तसेच भाजपाच्या लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल विचार करून बोलावं, असंही म्हटलं. ते सोमवारी (२१ नोव्हेंबर) बुलढाण्यात पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय गायकवाड म्हणाले, “भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावकरकरांच्या मुद्द्यावर सावरकरांनी पाचवेळा माफी मागितली, तसेच पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिले होते अशी भाषा वापरली. त्या त्रिवेदींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बालसंभाजीसह आग्र्याला औरंगजेबाच्या ज्या दरबारात कोणी मान वर करत नाही, त्या दरबारात ताठ मानेने खडेबोल औरंगजेबाला खडेबोल सुनावण्याचं धाडस दाखवलं.”
“यानंतर आम्ही असा अपमान सहन करणार नाही”
“शिवाजी महाराज कधीही माफीनाम्याच्या मागे लागले नाही. शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. त्यांनी देशभरात स्वराज्य निर्माण केलं. भाजपाचे राज्यपाल किंवा त्रिवेदी या लोकांनी शिवाजी महाराजांविषयी विचार करून बोललं पाहिजे. यानंतर आम्ही असा अपमान सहन करणार नाही,” असं मत संजय गायकवाडांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“…तर शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं”
“आम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून देऊ की, भाजपाच्या लोकांकडून सारखासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. यामुळे शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं. त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील,” असा गंभीर इशारा संजय गायकवाडांनी भाजपा नेत्यांना दिला.