ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील एका कसिनोमधील फोटो शेअर केला आहे. बावनकुळे यांनी रविवारी (१९ नोव्हेंबर) मकाऊ येथील कसिनोमध्ये सुमारे साडेतीन कोटी डॉलर उडवले, असा अप्रत्यक्ष दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या पोस्टनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुणाचे कुणाशी संबंध आहेत आणि कोण कुणाच्या बेडरुममध्ये गेला? हे राजकारणाचे विषय असू शकत नाही. संजय राऊतांची मानसिकता ढासळली आहे, हे आता निश्चितच झालं आहे. त्यांनी आता स्वत:चा उपचार करून घ्यावा, असा टोला शिरसाट यांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
बावनकुळेंच्या कसिनोतील फोटोंबाबत विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊतांना अद्याप शिवसेना कळाली नाही, हे मला आता स्पष्टपणे जाणवू लागलं आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकदा गोपीनाथ मुंडेंना म्हणाले होते, ‘प्यार किया तो डरना क्या’. त्यावेळी गोपीनाथ मुंडेंबाबत एक अफवा समोर आली होती. तेव्हा उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसाला शिवसेनाप्रमुखांनी असं म्हटलं होतं.”
हेही वाचा- “मनोज जरांगेंना मारण्याची…”, ठाकरे गटाच्या नेत्याची भुजबळांवर टीका
त्यामुळे बावनकुळे कसिनोमध्ये गेले आणि ते जुगार खेळले, तर काय झालं? एखाद्याने दारु प्यायली तर काय झालं? राजकारणातील सगळे लोक संन्यासी असतात का? असा सवालही शिरसाट यांनी विचारला.
हेही वाचा- “ठाण्यातील सभा म्हणजे माझ्या विरोधातील…”, मनोज जरांगेंच्या ठाणे दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
“अशा सगळ्या गोष्टींशी एखाद्याला चिटकवू नका. समाजसेवा करताना हे सगळे लोक काय करतात, याकडे लक्ष द्या. बाकी फालतू गोष्टींकडे लक्ष देऊन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. कुणाचे कुणाशी संबंध आहेत आणि कोण कुणाच्या बेडरुममध्ये गेला, हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. म्हणून संजय राऊतांची मानसिकता ढासळली आहे, हे आता निश्चितच झालं आहे. त्यांनी आता स्वत:चा उपचार करून घ्यावा,” असा टोलाही संजय शिरसाटांनी लगावला.