शिवसेनेच्या शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे. “राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले, तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील”, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. ते सोमवारी (३ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, “अशोक चव्हाण भाजपात जातील असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत. बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत, कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे.”
“…तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील”
“विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले, तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील. असं त्यांचं उलटं पालटं गणित आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत साशंकता आहे. असं असलं तरी अशोक चव्हाण यांची मानसिकता झाली असावी. ते निश्चितपणे भाजपात प्रवेश करतील,” असंही शिरसाटांनी नमूद केलं.
“काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी मंचावर बसले”
संजय शिरसाट मविआच्या संभाजीनगरमधील सभेवर टीका करताना म्हणाले, “ही वज्रमूठ नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी मंचावर बसले होते. हे कधीही एक होणार नाहीत. त्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नाहीत. ते एवढे आजारी होते का की, सभेला आले नाहीत. आज तेच नाना पटोले सुरतला कोर्टात चालले आहेत.”
हेही वाचा : VIDEO: काँग्रेसमध्ये तुमच्याविरोधात नाराजी आहे का? प्रदेशाध्यक्षपद जाणार का? नाना पटोले म्हणाले…
“अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील”
“काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही, असं एकंदर दिसत आहे,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला.