एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून ४० आमदार आपल्या गळाला लावले. विधानसभेतील संख्याबळ कमी झाल्याने महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं. परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, भाजपा-शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. बंडखोरी नंतर स्थापन झालेल्या शिंदे-भाजपा सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
हेही वाचा >> VIDEO: राज्यातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? देवेंद्र फडणवीसांनी केलं जाहीर, म्हणाले…
शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेची सर्व सोशल मीडिया खाती ठाकरे गटाने आपल्याकडे ठेवली. त्यामुळे शिंदे गटाचं अधिकृत सोशल मीडिया खातं नव्हतं. अखेर, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेने त्यांचं अधिकृत सोशल मीडिया खातं लॉन्च केलं. या खात्यावरून आता शिंदे गटाविषयीच्या कार्यक्रमांची अधिकृत माहिती दिली जाते. याच खात्यावरून सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ट्वीट करण्यात आलं आहे.
हेही वाचा >> शिंदे गट आणि भाजपमधील बेबनाव जनतेसमोर आला, शिंदे – फडणवीस सरकारची वर्षपूर्ती
“महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना.. आशीर्वाद शिवछत्रपतींचे एक वर्ष सुराज्याचे…”, असं ट्वीट शिवेसनेच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आलं आहे. यामध्ये एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं याचे काही महत्त्वाचे क्षण अधोरेखित करण्यात आले आहेत. तसंच, त्यांच्या भाषणातील काही वाक्येही या व्हिडीओत ऐकायला येत आहेत. तसंच, वर्षभरात सरकार स्थापन झाल्यापासून काय काय अडचणी आल्या, सरकारने कसं कसं काम केलं याचा आढावाही या व्हिडीओच्या माध्यमातून काव्यरुपाने सादर करण्यात आला आहे.
“संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, प्रत्येक वाट होती रोखलेली, वार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी. पण एकाकी लढाई होती, देव, देश आणि धर्मासाठी म्हणून फडकला भगवा वादळातही. नेतृत्त्वाने कवेत घेतला अवघा आसमंत संपवले दरबारी राजकारण आणि गहिवरून गेले जनमन. सुरू प्रत्यक्ष गतिमान कारभार, विकासाची दिसली दिशा, महाराष्ट्राच्या समृद्धीची उजळली भाग्यरेषा. सुराज्याच्या उदयाने आली वेगवान कारभाराची प्रचिती, जनतेच्या सरकारची झाली वर्षपूर्ती. शिवछत्रपतींचा हाच विचार, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा हाच आदर्श, धर्मवीरांची हीच शिकवण या महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी प्रखर हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी सज्ज पुन्हा शिवसेना”, असे बोल या व्हिडीओमध्ये आहेत.