तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मॉलमधली वाईनविक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई?
“मॉलमध्ये वाईन विक्रीचा मसुदा जेव्हा जनेसाठी खुला करण्यात आला होता. आम्ही या संदर्भात लोकांची मत जाणून घेतली. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अनेकांनी याबाबत सुचना केल्या आहेत. त्यानुसार या निर्णयाच्या समर्थनात आणि विरोधात किती जणं आहेत, त्याचा अभ्यास सुरू आहे. विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर काम करत आहेत. येत्या १५ दिवसांत यासंदर्भातला अहवाल माझ्याकडे येईल, त्यानंतर मी स्वत: याचा अभ्यास करून लोकांची मत काय आहेत, हे जाणून घेतल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चाही करणार आहे”, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
हेही वाचा – दसरा मेळाव्यासाठी शेवटचा पर्याय काय? शिवसेना रस्त्यावरची लढाई लढणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
भाजपाने केला होता विरोध
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयला त्यावेळी विरोधात असणाऱ्या भाजपाने विरोध केला होता. त्यावरही शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला हवी असलेल्या फॉरमॅटमध्ये माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती संकलीत झाल्यानंतर आणि त्यावर माझ्या अभ्यास झाल्यानंतर मी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन, त्यांना संदर्भात सविस्तर माहिती देईन, मला विश्वास आहे की या निर्णयला आमचे भाजपाचे सरकारीही पाठिंबा देतील.”