मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. दरम्यान, शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणं पार पडली. या भाषणातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जर ठाकरे सरकारच्या तुलनेत पाचपट अधिक कामं केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे.
शिंदे गटातील आमदार नाराज असून यातील २२ आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, शिंदे-फडणवीस सरकारबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. शिंदे गटातील ४० पैकी २२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार नाराज आहेत, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पण माझं त्यांना आव्हान आहे की, संपर्कात असलेली व्यक्ती आहे? त्याला व्यासपीठावर उभं करावं, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.
मागील महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्षे आणि आमचे ९० दिवस याचा विरोधकांनी हिशोब लावावा. तुमच्यापेक्षा पाचपट कामं जर या सरकारने केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असंही आव्हानही गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिलं आहे.
हेही वाचा- ‘उडत्या बस’नंतर देशात ‘ई-हायवे’ बनवण्याची सरकारची योजना, नितीन गडकरींची भन्नाट संकल्पना
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाच्या नावाचा अर्थही सांगितलाय. ‘शि’ म्हणजे शिस्तबद्ध, ‘व’ म्हणजे वचनबद्ध, ‘से’ म्हणजे सेवाभावी ‘ना’ म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही, ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना, असा अर्थ गुलाबराव पाटलांनी सांगितला आहे.