शिवसेनेचा ( ठाकरे गट ) दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच शिवसेना ( शिंदे गट ) नेते, नरेश मस्के यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे. आमचा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा मेळावा असणार आहे. वारसा हा विचारांचा असावा लागतो. सडक्या मनोवृत्तीचा नसावा,” असं टीकास्र नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंवर डागलं आहे.
हेही वाचा : “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध, मी कधीही…”, एकनाथ शिंदेंची ग्वाही
“हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलं”
“हलक्या मनाचे, कुचक्या वृत्तीचे, आतल्या गाठीचे आणि शिवसैनिकांपासून दूर गेलेलं नेतृत्व आमच्यावर टीका करत आहे. कुठला तुमचा मेळावा? तुम्ही हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलं. निवडणुका शिवसेना-भाजपा युती म्हणून लढल्या. नंतर खुर्चीसाठी विरोधकांशी हातमिळवणी केली,” असा आरोप नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंवर केला.
“…तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही का?”
“तुम्ही पळपुटे आहात. ज्या शिवसैनिकांनी समाजवादी आणि कम्युनिस्टांशी लढा दिला. कित्येकांचे बळी गेले. त्या शत्रूंना भेटणारे तुम्ही आहात. बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलात. तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही का?” असा सवाल मस्केंनी ठाकरेंना विचारला आहे.
हेही वाचा : “…म्हणून नारायण राणे मराठा आरक्षणाचा विषय भरकवटण्याचा प्रयत्न करत आहेत”, सुजात आंबेडकरांचं विधान
“काँग्रेसच्या दाड्या कुरवळण्याचं काम”
“दसरा मेळाव्यात सावरकरांच्या, हिंदुत्वाच्या बाजूनं बोलणार आहात का? काँग्रेसच्या विरोधात बोलणार आहात का? त्याचं पहिलं उत्तर द्या… दसरा मेळाव्यात बाळासाहेब काँग्रेसच्या विरोधात तोफ डागायचे. आता त्यांच्या दाड्या कुरवळण्याचं काम तुम्ही करताय,” असा हल्लाबोल मस्केंनी ठाकरेंवर केला आहे.