शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडणार आहे. यासाठी शिंदे गटाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना का फुटली? का दोन भाग झाले? का दोन मेळावे घ्यावे लागलं? याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल, असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रामदास कदम म्हणाले, “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक स्वत: येतील. त्यामुळे शिवसेना कोणाची याचा निर्णय न्यायालयाच्या आधी पाच तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्याला लागेल. शिवसेनेची ताकद असती, तर ५० आमदार आणि १२ खासदार आपल्याला सोडून गेले नसते. एक झेंडा, एक मैदान, एक विचार, एक नेता हे शिवसेना प्रमुखांच्या वेळी होते. राष्ट्रवादीतून भाड्याने आणलेल्या लोकांना नेते, उपनेते बनवून आमच्या अंगावर सोडलं जात आहे. त्याची सर्व उत्तर उद्याच्या मेळाव्यात मिळतील,” असा निशाणा रामदास कदम यांनी साधला आहे.
हेही वाचा – संजय शिरसाट यांनी कंत्राटदाराला धमकावले, अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
“उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी…”
रामदास कदम यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं होते. त्याला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे. त्यांचा मेंदू सडलेला आहे. नासक्या डोक्यातून नासके विचार येतात. भास्कर जाधवांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परत, शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत आले. उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी हे बाटगे पणा दाखवत आहेत,” अशी टीकाही रामदास कदम यांनी केली आहे.