पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ( ८ ऑगस्ट ) महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांशी संवाद साधला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली, असा हल्लाबोल मोदींनी केला उद्धव ठाकरेंवर केला होता. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना ( शिंदे गट ) शंभुराज देसाई यांनीही यावर भाष्य केलं आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली. विनाकारण वाद निर्माण करण्यात आले, तरीही आम्ही ते सहन केलं. एकीकडे सत्तेत राहायचं आणि दुसरीकडे टीका करायची, हे कसं चालणार?” असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला होता.
हेही वाचा : “…तर नरेंद्र मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे”, काँग्रेसची प्रतिक्रिया
यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना शंभुराज देसाईंनी पंतप्रधान मोदींचं वक्तव्य १०० टक्के खरे असल्याचं म्हटलं आहे. “त्यावेळी शिवसेनेनं हटवादी भूमिका घेतली होती. अपेक्षेपेक्षा जास्त जागा मागण्यात आल्या. त्यामुळे भाजपाबरोबर असलेली युती तुटली. पंतप्रधान मोदींचं विधान १०० टक्के सत्यच आहे,” असं शंभुराज देसाई म्हणाले.
“जुने रेकॉर्ड मोदींनी तपासावे”
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “शिवसेनेनं युती तोडली, असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील, तर ते दिशाभूल करत आहेत. २०१४ ची परिस्थिती पंतप्रधानांना आठवायला हवी. २०१४ साली युती कोणी आणि का तोडली हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यानंतर शिवसेना स्वतंत्र लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झाले आहोत, असं भाजपातर्फे अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं. त्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली, याचे जुने रेकॉर्ड पंतप्रधानांनी तपासून पाहावे,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.