सहामहिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासमवेत सत्ता स्थापन केली. राज्यात नवीन सरकार स्थापन झालं, तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये जोरदार कलगीतुरा सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सत्तास्थापनेबाबत, बंडखोरीच्या कारणांबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. दरम्यान, आता एकनाथ शिंदेच्या डोक्यात बंडखोरीचे बीज मीच पेरले, असा दावा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित एका कार्मक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा – “काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला मांडीवर बसवून…”, शंभूराज देसाईंचा संताप; म्हणाले “ही शोकांतिका आहे”
काय म्हणाले विजय शिवतारे?
“२०१९ मध्ये राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, ते राज्याच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच उचल खाल्ली होती. हा उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजय बापू शिवतारेंनी घातलं”, असं विधान विजय शिवतारे यांनी केलं आहे. “महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे बसलो होतो. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की, राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जे चाललं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा की ही महाविकास आघाडी तोडली पाहिजे. राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले पाहिजे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये असलेली नावं…”, संजय राऊतांकडून एसआयटी चौकशीची मागणी
“शिवसेना-भाजपा युतीच्या ७० जागा उद्धव ठाकरेंनी स्वत: घालवल्या. कोणत्या जागा जिंकायच्या, कोणत्या जागा पाडायच्या, सरकार बनवण्यासाठी आकडेवारी कशी जोडायची, हे कट कारस्थान निवडणुकीच्या आधीच झालं होतं”, असा आरोपही त्यांनी केला. “महाविकास आघाडी होणार हे निवडणुकीनंतर झाली हे सांगून लोकांना फसवत आहेत. महाविकास आघाडी होणार हे निवडणुकीच्या आधीच ठरलं होतं”, असा दावाही त्यांनी केला.