‘‘महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले’’, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री उदय सामंत यांनीही पंतप्रधानांच्या विधानावर भाष्य केलं आहे.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, “मोदींनी पंतप्रधान झाल्यावर जे प्रयत्न केले, ते आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झालेले नाही. याआधी शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही.”
मनोज जरांगे-पाटलांना दिलेला शब्द सरकारनं पाळला नाही, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. याबद्दल प्रश्न विचारल्यावर उदय सामंतांनी म्हटलं, “उद्धव ठाकरे नेहमी शिव्या घालतात, टोमणे मारतात. ते कधी शिव्या घालत नाही हे सांगा. जरांगे-पाटलांना मी सुद्धा भेटलो होतो. न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण आम्हाला द्यायचं आहे.”
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली छत्रपतींची शपथ, भास्कर जाधव म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या मनात…”
“देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं. पण, सरकार बदलल्यावर ते टिकू शकलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे,” असं सामंतांनी सांगितलं.
हेही वाचा : राज्यातील २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार पंतप्रधानांची ग्वाही; शिर्डी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण
मंत्रिमंडळ विस्तारावरही उदय सामंतांनी भाष्य केलं आहे. “मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील बाब आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करतील हा विश्वास मला आहे,” असं उदय सामंत म्हणाले.