महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहिले आहेत. त्यातच आता राज्यपाल कोश्यारी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेने राज्यपालांच्या विधानावरून सडकून टीका केली आहे. तर, काही संघटनांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत हटवण्याची मागणी केली आहे. यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यपालांचे विधान मी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. मात्र, नितीन गडकरी चांगली काम करतायत म्हणून राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केला असेल,” असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “शिवसेना फोडली, इथे…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना सवाल
काय म्हणाले राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.