पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तापालट होत, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडखोर आमदारांवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रवक्त्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल करत आहेत. आता सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रा विदर्भात जाणार आहे. त्यापूर्वी शिंदे गटातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली आहे.
“सुषमा अंधारे प्रखर आंबेडकरवादी चळवळीतून आल्या असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. बाळासाहेबांचे विचार आणि प्रखर हिंदूत्व सुषमा अंधारेंनी स्वीकारलं का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोडले असतील, तर ते बाळासाहेबांचे विचार स्वीकारतील का? तीन महिन्यात हिंदूत्व समजणे सोप्प नाही,” असे नरेंद्र बोंडेकर यांनी म्हटलं.
हेही वाचा : “किरीट सोमय्या ब्रम्हदेव नाही”, अनिल परब संतापले; म्हणाले, “नारायण राणे आणि सुभाष देशमुखांच्या…”
“सुषमा अंधारेंनी विदर्भातून निवडणूक लढवावी,” असे आव्हान देत नरेंद्र बोंडेकर म्हणाले, “त्यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही. नेत्यांना खूश करुन विधानपरिषद आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी त्या स्टंटबाजी करत आहेत. यापेक्षा त्यांनी लोकांमधून निवडून आलं पाहिजे. भगवा घालून टीका करणे, आव्हान देणे हे चालत नाही. लोकांची कामे करून निवडून येतात, त्याला खरे नेतृत्व म्हणतात,” असेही नरेंद्र बोंडेकर यांनी सांगितलं.