शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर रविवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आपली पत्नी व बहिणीसोबत देवदर्शन घेतलं. देवदर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर काही तरुणांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी ‘आला रे आला, गद्दार आला’, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी संबंधित हल्लेखोरांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हाताने मारण्याचाही प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर आमदार संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित हल्ल्याबाबत संतोष बांगर यांनी सांगितलं की, अमरावती दौऱ्यावर आल्यावर मी माझी बायको आणि बहीण आम्ही तिघे देव दर्शनाला गेलो होतो. देवदर्शन करून बाहेर पडल्यानंतर दहा-पाच लोकांनी नारेबाजी करत माझ्या गाडीवर हाताने मारण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं की याला हल्ला म्हणता येणार नाही, हल्ला कशाला म्हणतात? समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला आपण हल्ला म्हणतो.
हेही वाचा- “आपण आत्महत्या करायची नाही, पण…” भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान
“हा चोरपणा आहे. पूर्वीच्या काळी डाका टाकला जायचा. डाका (दरोडा) कशाला म्हणतात, तर घराच्या पुढे जाऊन फटाका लावायचा आणि सांगायचं की मी तुमच्या घरावर डाका टाकतोय. तो पूर्वीचा काळ होता. पण हे म्हणजे चोर प्रकरण आहे. हे मर्दानगीचं काम नव्हे. माझी बहीण आणि माझी पत्नी गाडीत नसती तर संतोष बांगर काय आहे? हे मी त्यांना सांगितलं असतं,” अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- अमरावती : आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल; ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा
“माझ्या गाडीला कुणी स्पर्शही केला तरी आम्ही त्यांना सोडणार नाही” अशा आशयाचं वक्तव्य संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान, रविवारी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. याबाबत विचारलं असता संतोष बांगर म्हणाले की, आजही मी तुम्हाला सांगतो, ज्या मतावर बोललो होतो, त्यावर मी ठाम आहे. आजही माझ्या गाडीला स्पर्श करून दाखवा, हा संतोष बांगर जे बोललाय ते केल्याशिवाय राहणार नाही, असंही बांगर म्हणाले.