शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘सामना’त खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांची जाहीरात झापण्यात आली आहे. त्यावर “साहेब मी गद्दार नाही, गेलेल्या ४० गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच खऱ्या अर्थाने अभिवादन केलं, याचं समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल”, असं लिहलं आहे. यावरून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चमचेगिरी करुन संजय राऊत बाळासाहेबांना अभिवादन करु शकत नाही. आम्ही गद्दार नाहीतर खुद्दार आहोत, हे वारंवार स्पष्ट केलं आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सवंगड्यांना गाडणारा जन्माला यायचा आहे. बाळासाहेबांचे विचार संजय राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखाली तुडवले आहेत. हे त्यांनी थांबवलं पाहिजे. तेव्हाच ते बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करु शकतात,” असं संजय गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा : धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले”, हिंदू राष्ट्रसेना प्रमुख धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका

“बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देत, अभद्र युत्या केल्या. आमच्यामुळे संजय राऊत खासदार झाले, पहिल्यांदा त्यांनी राजीनामा द्यावा. मग खासदार होऊन दाखवावे,” असे आव्हान गायकवाड यांनी राऊतांना दिलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, “पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा. घरात बसून पक्ष चालवणारा नसावा. संघटनेच्या कार्यकर्त्यांबद्दल स्नेहभाव आणि आपुलकी असावी. कार्यकर्त्यांना वेळ आणि पक्षबांधणी करावा असावा. पक्षमुखांची विचाराधारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मिळणार नसावी. हे सर्व गुण एकनाथ शिंदे यांच्यात आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत.”

हेही वाचा : ठाकरे-आंबेडकर युतीला राष्ट्रवादीचा हिरवा कंदील? जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान

शिवसेना ही सळसळत्या रक्तावर आहे, खोक्यावर नाही, असा टोला संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे. त्यालाही संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुमच्या लोकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह जाण्यासाठी किती खोके घेतले. भाजपा आणि सेना म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलं. मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेला, तेव्हा किती खोके घेतले, हे सांगा. आम्ही खोके नाहीतर हिंदुत्वाच्या विचारांसाठी गेलो. संजय राऊतांची आम्ही फार दखल घेत नाही,” असा टोमणा संजय गायकवाड यांनी लगावला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla sanjay gaikwad attacks sanjay raut and uddhav thackeray ssa