माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मराठी भाषा दिनानिमित्त केलेल्या भाषणातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख बांडगुळं असा केला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचा वृक्ष उभा केला आहे. जे गेले ते बांडगुळं होती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही बांडगुळं नाहीत. आम्ही बाळासाहेबांनी उभा केलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या आहोत. हा वटवृक्ष बाळासाहेबांच्या विचाराने मजबुतीने उभा आहे. त्यांना (उद्धव ठाकरेंना) आम्ही बांडगुळं वाटत असू तर आज या बांडगुळांनी त्यांना शक्ती दाखवून दिली आहे. आज ते कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहोत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे,” अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- VIDEO: “तुम्ही गद्दार आहात, एका डाकूबरोबर…”, बच्चू कडूंची गाडी आडवून वयोवृद्धाने झापलं
संजय गायकवाड पुढे म्हणाले की, ठाकरेंच्या नावाबद्दल उद्धव ठाकरे जे काही बोलले आहेत, त्यावर एवढंच सांगू इच्छितो की, बाळासाहेब ठाकरे यांची जी ठाकरी शैली आहे, ती कुणाकडेच नाही. ते एकदा बोलले की बोलले, मग हिंदुत्वाशी तडजोड नाही. काँग्रेसबरोबर जाण्याची माझ्यावर वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन, ही बाळासाहेब ठाकरेंची भाषा होती. त्यामुळे ठाकरे हे आडनाव फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभतं, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा- “राज्यातील कंपन्यांशी करार करण्यासाठी डाव्होसला जाण्याची गरज काय?”, अजित पवारांचा सवाल
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले होते की, शिवसेनेची वीण घट्ट आहे. आपली मूळं रुजली आहेत. त्यामुळे तुम्ही वरचे शेंडे-बुडके उडवा, काहीही फरक पडणार नाही. कुणाला वाटलं असेल की, ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं असेल, पण असं अजिबात नाही. काही वेळा बांडगुळं छाटली जातात. कारण ती बांडगुळं छाटावीच लागतात. ती आपोआप गळून पडत असतील तर आम्हाला आनंद आहे.
“अनेकदा बांडगूळ एवढं वाढतं की, बांडगुळाला वाटतं की तो स्वत: वृक्ष झाला आहे. पण झाडासाठी रस शोषणारी जी पाळं-मुळं असतात ती जमिनीत खोलवर रुजवावी लागतात. फाद्यांवरची जी बांडगुळाची पाळंमुळं असतात, ती फांदी छाटली की बांडगूळ मरतं. शिवसेना ही वृक्षाप्रमाणे निर्माण झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात… प्रत्येक ठिकाणी अन्यायावरती प्रहार करण्यासाठी शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत. याचा मला अभिमान आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.